
डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई शहर संग्रहालय
- डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई शहर संग्रहालयाची स्थापना १८७२ साली तत्कालीन व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, बॉम्बे म्हणून करण्यात आली. हे मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय असून देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने संग्रहालय आहे. या संग्रहालयातील संग्रहामध्ये भारतातील अलंकारिक कला तसेच १९व्या शतकातील मुंबईचे जीवन व इतिहास यांचे दर्शन घडते.
मुंबईत संग्रहालय स्थापन करण्याची कल्पना १८५० साली मांडण्यात आली. त्याच काळात १८५१ मध्ये लंडन येथील क्रिस्टल पॅलेसमध्ये होणाऱ्या पहिल्या "सर्व राष्ट्रांच्या औद्योगिक कलाकृतींच्या महान प्रदर्शनाची" तयारी सुरू होती. राणी व्हिक्टोरियांचे पती प्रिन्स अल्बर्ट यांना ब्रिटिश वसाहतींमधील औद्योगिक कला व हस्तकला जगासमोर सादर करून या उत्पादनांच्या व्यापाराला चालना द्यायची होती. या महान प्रदर्शनासाठी बॉम्बे प्रेसिडेन्सीकडून पाठविण्यात आलेल्या भारतातील सुंदर कला व हस्तकलेच्या प्रतिकृती या नवीन संग्रहालयाच्या संग्रहाचा केंद्रबिंदू ठरल्या. हे संग्रहालय १८५७ साली मोठ्या उत्सुकतेने आणि कुतूहलाने सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले.
१८७२ साली सध्याच्या ठिकाणी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, बॉम्बे म्हणून संग्रहालयाची वास्तू उभारण्यात आली. १९७५ मध्ये या संग्रहालयाचे नाव बदलून डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय असे करण्यात आले. संग्रहालयाच्या स्थापनेसाठी ज्यांची दूरदृष्टी आणि समर्पण महत्त्वाचे ठरले, त्या महान व्यक्तीच्या सन्मानार्थ हे नामकरण करण्यात आले.
संग्रहालयाच्या संग्रहामध्ये उत्कृष्ट व अलंकारिक कलाकृतींचा समावेश आहे. या कलाकृती बॉम्बे प्रेसिडेन्सीतील विविध समुदायांनी जोपासलेल्या हस्तकलेचे महत्त्व दर्शवितात. तसेच मुंबईतील लोकांचे जीवन आणि १९व्या तसेच २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील शहराचा इतिहास दर्शविणाऱ्या मातीच्या प्रतिकृती व त्रिमितीय देखाव्यांचा (डायोरामा) असामान्य संग्रह येथे आहे.
टीप: अधिक माहितीसाठी भेट द्या: www.bdlmuseum.org









